आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जातेय “कीटकजन्य आजारमुक्त गाव” संकल्पना

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे १ हजार ३०३ गावांमध्ये मागील सलग ३ वर्षांत हिवतापाचा (मलेरिया) एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही गावे कीटकजन्य आजार मुक्त गाव घोषित करण्यात आली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली किटकजन्य आजाराचे निर्मूलन करण्यासाठी नियमित सर्वेक्षण, उपाययोजना व आरोग्यशिक्षण याच्या माध्यमातून काम करत असलेल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांच्या एकत्रितपणे प्रयत्नाने हे साध्य झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आरोग्य विभागाने राबविलेल्या “किटकजन्य आजारमुक्त गाव” या संकल्पनेचे व या उल्लेखनीय कामाबद्दल अभिनंदन केले आहे व यापुढेही ही संकल्पना नियमित प्रभाविपणे राबवावी याबाबत सर्व सूचना १२ मार्च रोजी जिल्हा परिषद येथे झालेल्या आरोग्य समिती सभेमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.

उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे लोक घरामध्ये भांड्यामध्ये, कंटेनरमध्ये जास्त काळासाठी पाण्याचा साठा करतात. हे पाणीसाठे जास्त काळ उघड्या अवस्थेत राहिले तर त्यात डास अळ्या तयार होऊन डास उत्पत्ती होते. परिणामी मलेरिया, डेंग्यू सारख्या कीटकजन्य आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरीकानी पाणीसाठे व्यवस्थित झाकून मगच पाण्याचा वापर करावा तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये केले आहे.

मलेरिया, डेंग्यू , हत्तीरोग निर्मूलनाच्या मोठ्या ध्येयाकडे एक पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) सारख्या जागतिक आरोग्य संघटनांनी २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे आवाहन केले आहे. दरवर्षी असंख्य व्यक्तींना त्याचा त्रास होतो. तथापि, कीटकनाशकांवर उपचार केलेल्या मच्छरदाण्यांचे वितरण, ऑईल बॉल पद्धत, नियमित रक्तनमुना तपासणी, कंटेनर तपासणी, टेमेफोस, कीटकनाशक फवारणी आणि व्यापक जागरूकता मोहिमा यासह व्यापक प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच “कीटकजन्य आजार मुक्त गाव” ही संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करू, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!