पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यु.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी दापोली येथील प्रा. शेषराज तिरपुडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हरहर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देवून जयघोष केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक व राजकीय जीवन कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल आग्रे याने आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार, लढण्यातील गणिमीकावा, प्रजेची सुरक्षितता यातून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे सांगितले.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. कांचन कदम, डॉ. सुभाष खोत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सुभाष घडशी, महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक सुधीर टानकर, सौ. स्नेहल संसारे, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण, संदीप चव्हाण, महेश झगडे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले. आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.


