मुख्य बातमी

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

दीडशे दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रम

रत्नागिरी : दीडशे दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांचा आज (२८ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉटसअप चॅटबॉट, कृत्रिम बुध्दीमत्ता व ब्लॉगचेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर या सात घटकांमुळे कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. ३४ सर्वोत्तम पोलीस अधीक्षकांमध्ये २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधिक्षक कार्यालय पाचवे ठरले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी मिशन प्रतिसाद, मिशन जीवन, मिशन प्रगती, रेड्स ॲप, बंदोबस्त ॲप, मिशन परिपूर्ती, मिशन फिनिक्स, रत्नागिरी सेफ ड्राईव्ह, मिशन पोलीस पाटील, डिजिटल गाववारी, मिशन सायबर जागृती, रत्नसेतू चॅटबॉट, मिशन गस्त, मिशन निरीक्षण, स्वॅम्प पोलीस, प्रोजेक्ट सिगल, मिशन गती, मिशन ग्रामसुरक्षा, मिशन नवीदिशा, मिशन आरोग्य, मिशन जागृत नागरिक, व्हॉटसप चॅनेल असे जिल्ह्यात २४ नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम सुरू केले आहेत.

मिशन जीवन : जिल्ह्यातील एकाकी जीवन जगणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आधार व आपुलकी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस पाटील यांच्या मदतीने सर्व जेष्ठ नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस त्यांच्या घरी जावून साजरा करुन पोलीस प्रशासनाकडून शुभेच्छा व सन्मान देण्यात येतो. आज अखेर एकाकी राहणाऱ्या ५० हजार ८०३ जेष्ठ नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. १० हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र प्रदान करण्यात आले आहे.

रेड्स ॲप : गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेड्स ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये हिस्ट्री सिटर, पाहिजे, फरार आरोपी, तडीपार व माहीतगार आरोपी यांची माहिती फोटोसह संकलित करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानांचे गुगलमॅप लोकेशन निश्चित करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी तपासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच अनोळखी मृतदेहांच्या चेहऱ्याचे डिजीटल फोटो रिकंस्ट्रक्शन करुन ओळख पटविण्यास मदत होते. हरविलेल्या व्यक्ती किंवा फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी चेहऱ्याचे १०८ विविध फोटो व्हेरिअशन तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला जात आहे. आत्तापर्यंत या ॲपच्या माध्यमातून ७ बेपत्ता व्यक्तींचा शोध यशस्वीरित्या घेण्यात आला असून ५ अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यात यश मिळाले आहे.

बंदोबस्त ॲप : जिल्ह्यातील बंदोबस्त व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबध्द व तंत्रस्नेही करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. ॲपच्या माध्यमातून कोणत्याही कार्यक्रम, आंदोलन, उत्सव किंवा संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त अत्यंत सुकर पद्धतीने लावता येतो. वरिष्ठ अधिकारी, चेकिंग अधिकारी यांना बंदोबस्तातील अधिकारी, अंमलदारांचे लाईव्ह ट्रॅकिंग करता येते. नियुक्त पॉईंटवरून कोणी हलल्यास त्वरित अलर्ट निर्माण होते. या ॲपच्या माध्यमातून आत्तापर्यंत ५०८ बंदोबस्त यशस्वीरित्या लावण्यात आले आहेत.

मिशन फिनिक्स : मिशन फिनिक्स अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण ४८ गुन्हे दाखल करण्यात येवून ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय ३२ लाख ७३ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिशन प्रगती : तक्रारदारांना त्यांच्या दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळेवर माहिती व अपडेटस मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा उपक्रम सुरु केला. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर फिर्यादींना नियमितपणे माहिती देण्यात येते. १ हजार ५६८ फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्याबाबत तपासाची माहिती देण्यासाठी ५ हजार ११ संदेश पाठविण्यात आले आहेत.

मिशन प्रतिसाद : ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत व सहकार्य मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. जेष्ठ नागरिकांच्या समस्या व तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी 9684708316 व 8390929100 हे दोन हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र सेलची स्थापना केली आहे. जिल्ह्यात २२१ ज्येष्ठ नागरिकांना याद्वारे मदत करण्यात आली आहे.

रत्नसेतू चॅटबॉट : या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना एका क्लिकवर पोलीस सेवांचा जलद व सोपा लाभ मिळत असून विविध प्रकारच्या समस्यांसाठी तात्काळ मार्गदर्शन व मदत पुरविण्यात येत आहे. रत्नसेतू चॅटबॉटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत, महिलांसाठी सहाय्य, आपत्कालीन सेवा, तक्रार नोंदणी, गोपनीय माहिती देणे, तक्रारीची स्थिती जाणून घेणे बाल सहायता, उद्योग व्यापार मार्गदर्शन, सागरी सुरक्षा तसेच सामान्य माहिती यासारखे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 9371415612 या व्हॉटसॲप क्रमांकावर चॅटबॉट कार्यरत असून ६८ तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले आहे.

मिशन गती : प्रलंबित गुन्ह्यांची जलद निर्गती करुन तपास प्रक्रियेत गती आणण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. भाग १ ते ५ मधील गुन्हे, भाग ६ मधील गुन्हे, अपघाती मृत्यू प्रकरणे, मुद्देमाल व बेपत्ता प्रकरणे यांचा तपास फास्ट ट्रॅकवर घेवून वेळेत निर्गती करण्यासाठी हे मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दाखल १७६६ गुन्ह्यांपैकी १६०४ गुन्ह्यांची निर्गती जलद गतीने तपास करून विहीत मुदतीत करण्यात आली आहे.

मिशन संवेदना : महिला व बालकांवरील अत्याचारासंबंधी गुन्ह्यांचा तात्काळ तपास व जलद न्यायप्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी मिशन संवेदना सुरू करण्यात आला. लैंगिक अत्याचार, छेडछाड, पळवणूक तसेच पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांची ४८ तासांत निर्गती व दोषारोप पत्र वेळेत दाखल करण्याबाबत भर देण्यात आला आहे. याअंतर्गत दाखल ८० गुन्ह्यांपैकी ७३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र जलद गतीने दाखल करण्यात आले आहे. एकूण ११ गुन्ह्यांचे निकाल होवून दोष सिद्ध झाले आहेत.

मिशन परिपूर्ती : डायल १२ वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर नागरिकांना वेळेत पोलीस मदत पोहोचते की नाही याची खात्री करण्यासाठी या मिशनची सुरुवात झाली. डायल ११२ वर आलेल्या प्रत्येक तक्रारीचा मिशन परिपूर्ती सेलद्वारे पुन्हा संपर्क साधून पाठपुरावा घेण्यात येतो.

डिजिटल गाववारी : जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा इतिहास, नोंदी व पारंपरिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल गाववारी उपक्रम राबविण्यात येतो. महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांचे जन व संरक्षण व्हावे यासाठी गाववारी पुस्तकांची डिजिटल प्रत सुरक्षितरित्या संग्रहीत करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. बगाटे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांचा पोलीसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. सामाजिक सलोखा समिती, मिशन सहभाग या माध्यमातून पोलीस दलाचा लोकाभिमुख चेहरा नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास, आपुलकी व विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे. या त्यांच्या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेत आज त्यांचा गौरव केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!