मुख्य बातमी

मिरजोळेत (रत्नागिरी) भरदुपारी घरफोडी; साडेआठ तोळे सोने, ५० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे पाटीलवाडी येथे भरदुपारी धाडसी दरोडा घालून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले राजेश बबन भाटकर यांच्या घरावर दरोडेखोरांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसाढवळ्या घरेही सुरक्षित राहिली नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे बारा ते साडेबारा या वेळेत हा प्रकार घडला. भाटकर यांच्या घरासमोर एक गाडी थांबवून काही जण उतरल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले. विशेष म्हणजे, पावसाळा नसतानाही संबंधित व्यक्तींनी रेनकोट परिधान केले होते. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास राजेश भाटकर आणि त्यांच्या पत्नी घरी परतले असता घरातील दिवे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करताच कपाटे उघडी असल्याचे दिसले आणि घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

रत्नागिरी–करबुडे विमानतळ मार्गावरील वर्दळीच्या परिसरात भरदिवसा दरोडेखोरांनी इतक्या शिताफीने चोरी करून पसार होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या धाडसी गुन्ह्यामागील आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून, परिसरातील नागरिकांनीही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!