कुवारबाव येथे दुचाकीची उभ्या शिवशाहीला धडक; दोघे गंभीर

रत्नागिरी : कुवारबाव रेल्वेस्टेशन रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
रोहित राजू सावंत (वय २३) व साईल संतोष धोत्रे (वय २३, दोघेही रा. कुवारबाव-कातळवाडी, रत्नागिरी) अशी जखमींचा नावे आहेत. यातील स्वार साईल धोत्रे याला गंभीर दुखापत झाल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (ता. ८) रात्री अकरा च्या सुमारास कुवारबाव रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुवारबाव -रेल्वे स्टेशनसमोर मुख्य रस्त्यावर एसटीची शिवशाही बस उभी होती. त्यावेळी साईल धोत्रे हा दुचाकी (क्र.एमएच-०८ बीबी २८४१) सोबत रोहित सावंत यास घेऊन येत होता.दुचाकीवरुन वेगाने येणाऱ्या साईलचा दुचाकीवरिल नियंत्रण सुटल्याने थेट उभ्या असलेल्या शिवशाही बस (क्र. एमएच-०९ इएम ९१८८) च्या पाठीमागच्या भागावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर मोटरसायकल बसच्या खालच्या भागात अडकली. दुचाकीस्वाराचे तोंड बसवर जोरात आदळल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि गंभीर जखमी झाला. क्षणात मोठा आवाज झाला आणि तो बसखाली फेकला गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.
जखमी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र साईल यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली असून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.



