मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वेळणेश्वर पोस्टमनने दीड वर्ष टपालांचे वितरण केलेच नाही

नव्याने रूजू झालेल्या पोस्टमास्तरांच्या पाठपुराव्यामुळे गंभीर प्रकार उघडकीस

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे पोस्टात आलेले टपाल गेली दीड वर्षे पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्टरांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघडकीस आली आहे. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रूजू झालेल्या पोस्टमास्टरांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करण थोरात नामक पोस्टमन कार्यरत आहे. येथील ग्रामस्थांकडून आपल्यासाठी आलेली टपाले मोबाईलवर ट्रॅकिंग रिपोर्ट आला असताना आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत म्हणून वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात विचारणा सुरू केली. अशामध्ये वेळणेश्वर पोस्ट ऑफिसमध्ये नव्याने रूजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी पोस्टमन करण थोरात याच्याकडे विचारणा सुरू केली. मात्र त्यावर पोस्टमन काहीच उत्तर देत नव्हता. अखेर पोस्टमनच्या घरी जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता पोस्टमनच्या घरी दोन पोतडी भरलेली टपाले आढळून आली.

ज्यामध्ये अनेकांचे बँकांची लिलाव नोटीस, पासबुके, चेकबुक, आधारकार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी सर्टीफिकेट, तलाठी यांच्यासाठी सन २०२४ मध्ये आलेली पत्रे, हायस्कूल यांना मुंबई विद्यापीठातून आलेली पत्र, कॉलेजची पत्रे, मोजणीची नोटीस आदी तब्बल दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीमधील टपाले मिळून आली. हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला असून पोस्ट इस्पेक्टर हिमांशू जोशी यांनीही या घटनेची पाहणी केली आहे. तसेच जिल्हा कार्यालयातूनही अधिकारी शनिवारी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी उपस्थित होते.

झालेले नुकसान कोण भरणार?

वेळणेश्वर ग्रामस्थांनी शुक्रवारी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयाला भेट दिली. यावेळी मोजणीची नोटीसा येऊनही लगतदाराला वेळीच न पोहचल्याने दोन ते तीन वेळा मोजणीसाठी फी भरावी लागली. अनेकांची दागिन्यांच्या लिलावाच्या नोटीसा येऊनही त्यांना नोटीसा न मिळाल्याने काहींचे दागिन्यांचे लिलाव झाले. आधारकार्ड व पॅनकार्ड न मिळाल्याने अनेकांची काम खोळंबली आहेत. यामुळे याची मोठ्या प्रमाणात झालेली नुकसान भरून कोण देणार? असा सवाल ग्रामस्थांनी केला असून यावर वरिष्ठ अधिकारी कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!