मुख्य बातमी

“ताल मिलाप”मधून सुर, ताल आणि नृत्याचा अविस्मरणीय संगम

रत्नागिरी : अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला “ताल मिलाप” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. गायन, वादन आणि नृत्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, उपाध्यक्ष मुकुंदराव जोशी, उपकार्याध्यक्ष विजयराव साखळकर, खातू रंगमंचाचे देणगीदार भालचंद्र श्रीराम खातू, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळ अध्यक्ष महेश नाईक, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, डॉ आनंद आंबेकर, सुवर्ण महोत्सव समिती समन्वयक वैभव कानिटकर, माजी शिक्षक नुरुद्दिन परकार व त्यांच्या पत्नी मेहरूनिसा परकार उपस्थित होते.

“ताल मिलाप”मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. गायन विभागात ऊर्जा आपटे, सार्था गवाणकर, अदिती सावंत, वृंदा दळवी आणि पृथ्वीराज जोशी यांनी सुरेल गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य विभागात पूर्वा हातफळे, गौरी सावंत, प्रार्थना भंडारे, श्वेता गावडे, आस्था खेडकर आणि गायत्री ठीक यांनी विविध नृत्यशैलींचा अप्रतिम आविष्कार सादर केला.

वाद्यवृंदात हर्ष बोंडाळे, पारितोष काळे, साहिल पेंढारी, अजिंक्य शिंदे, जाई जोशी, स्वरूप नेने, चिन्मय साठे, अभिषेक धुळप, पार्थ देवळेकर, गंधार दामले, अवधूत जोशी आणि आर्यन निकम यांनी तालबद्ध साथ देत कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मैथिली सावंत, तन्मय डांगे, शुभम रहाटे, तनिष्का शिरधनकर, गंधाली मुळ्ये आणि जान्हवी पालकर यांनी प्रभावीपणे केले. प्राध्यापक वेदांग सौंदळगेकर, डॉ. आनंद आंबेकर आणि हरेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला.

संपूर्ण कार्यक्रमात सुर, ताल आणि भावनांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. “ताल मिलाप” हा कार्यक्रम सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाचा एक अविस्मरणीय ठेवा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!