मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात
उभ्या कंटेनरला टेम्पोची धडक, चालक गंभीर

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तूरळ येथील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने टेम्पो पलटी होऊन केबिनचा चेंदामेंदा झाला.
या अपघातात कोल्हापूर येथील चालक रितेश पाटील गंभीर जखमी झाला. धडकेनंतर तो रक्ताच्या थारोळ्यात केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिक आणि पत्रकार मिलिंद चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चालकाला बाहेर काढत तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, आरवली ते तळेकांटे या पट्ट्यात सातत्याने वाढणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.



