मुख्य बातमी

शेतकऱ्यांना कॅनमधून पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी; ट्रॅक्टर, पंप कसे चालवणार?

पेट्रोल पंपावरील बंदीमुळे शेतकरी अडचणीत : ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळा व शेतीचा मुख्य हंगाम सुरू होत आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून कॅन, डब्यातून पेट्रोल-डिझेल देण्यास घातलेल्या बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना शेती कामासाठी इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन सादर केले. आजच्या काळात शेती यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे. शेतजमीन तयार करणे, नांगरणी, चिखलणी यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर वीडर, ब्रश कटर व पाण्याचे पंप यांसारख्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ही सर्व यंत्रे पेट्रोल-डिझेलवर चालतात; मात्र सध्या सुरक्षा नियम व इंधन कपातीचे कारण देत जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरून नागरिकांना कॅन, डबे, बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. “शेतात चालणारी अवजड यंत्रे थेट पेट्रोल पंपावर आणणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.

शेतीचा हंगाम काही दिवसांवर आलेला असताना इंधनाअभावी कामे वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या बंदीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी व शेतीच्या कामासाठी पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दत्ता कदम यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आवश्यक मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, शिवसेना तालुका प्रमुख मयूरेश्वर पाटील, उप तालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, सलिल डाफळे, बावा सावंत, कॉलेज कक्ष तालुका अधिकारी अमन राणे, उपविभाग प्रमुख सचिन सावंत देसाई, माजी विभागप्रमुख शैलेन्द्र चव्हाण, शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!