मुख्य बातमी

बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा; बविआ तीव्र आंदोलन छेडणार : सुरेश भायजे

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे. बहुजन विकास आघाडीने कुळांचा प्रश्न अनेक वर्षांपासून हाती घेतला आहे. नुकताच बविआच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर कुळांकडून अनेक गंभीर समस्या मांडण्यात आल्या. याबाबत तत्काळ तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. हा प्रश्न न सुटल्यास पुढील टप्प्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश भायजे यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न गेली अनेक वर्षे सातत्याने बहुजन विकास आघाडीने उचलून धरला. त्यासाठी सर्व तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय यावर मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्याचा शासन दरबारी परिणाम होऊन सन २००२ आणि २००६ साली कुळकायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हातील कुळांना न्याय मिळण्याच्या दृष्टिने सुलभ झाले.

परंतु कुळकायद्यामध्ये दुरुस्ती होऊनही सद्य परिस्थितीत अधिकारी वर्गाकडून न्याय मिळणे अवघड होत असल्याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया बेदखल कुळांकडून बविआकडे येत आहेत. कुळ कायद्यातील दुरुस्तीनुसार कुळांना शासन दरबारी न्याय मिळण्याऐवजी फार मोठा अन्याय सहन करावा लागत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हातील बेदखल कुळांना न्याय मिळण्यासाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यातील कलम ४ (२) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये गावचा सरपंच किंवा पोलिस पाटिल, किंवा विविध कार्यकारी संस्थेचा चेअरमन अणि लगत कब्जेदार यांनी बारा वर्षापेक्षा जास्त अर्जदारच्या कुळवहिवाटीचे प्रतिज्ञापत्र केले तर कुळ घोषित करण्याची तरतुद या दुरुस्तीने करण्यात आली आहे. तरीही संबंधीत अधिकारी कुळांना न्याय देत नाही, अशी भावना कुळवहिवाटदारांनी बविआकडे व्यक्त केली आहे.

या सर्वाची दखल घेत बविआचे नेते सुरेश भायजे, बविआ जिल्हाध्यक्ष तानाजी कुळ्ये, रत्नागिरी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र धावडे, संगमेश्वरचे तालुका अध्यक्ष नारायण भुरवणे, लांजा तालुका अध्यक्ष दिलीप चौघुले, बविआचे सल्लागार ॲड. संदीप ढवळ यांनी जिल्हा दौरा केला. त्यामध्ये कुळांच्या समस्या जाणून घेतल्या.

बेदखल कुळांच्या प्रश्नाचे स्वरूप आजही अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यातील हजारो कुळांच्या घराखालच्या जमिनी अद्याप कुळांच्या नावावर झालेल्या नाहीत. बेदखल कुळवहिवाटदारांच्या कुळवहिवाटीच्या जमिनी कुळांच्या प्रत्यक्ष वहिवाटी व कुळवहिवाट दावे केलेले असतानाही त्यांच्या नावे झालेले नाहीत, अशा समस्या समजून घेण्यात आल्या.

सर्व गोष्टींची दखल बहुजन विकास आघाडीने घेतली असून लवकरच बविआ तीव्र आंदोलन छेडणार आहे. त्याकरिता प्रथम प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. संबंधीत अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली न गेल्यास बविआच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुरेश भायजे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!