श्रुती बुजरबरुआ-गोडबोले यांचे २८मे रोजी रत्नागिरीत गायन

रत्नागिरी : शहरातील गुरुवर्य बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी आणि स्वराभिषेक- रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय,सुगम गायिका श्रुती बुजरबरुआ -गोडबोले यांची गायनाची मैफल २८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी ६.३० वाजता हे मैफल सुरू होणार आहे. रसिकांसाठी या मैफलीला विनामूल्य प्रवेश आहे.
श्रुती बुजरबरुआ यांचा जन्म आसाममध्ये एका संगीतपरिवारात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी आपल्या पालकांकडून मुनींद्र बुजरबरुआह आणि सौ. संगीता बुजरबरुआह यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी लखनौ येथील भातखंडे संगीत विद्यापीठमधून ‘संगीत विशारद’ व ‘संगीत अलंकार’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
२०१४ मध्ये पुण्यात आल्यानंतर त्यांनी नामवंत शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर आणि विदुषी प्रतिमा टिळक यांच्याकडे अभिजात भारतीय संगीताची संगीताची प्रगत तालीम घेतली.
शुद्ध शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, मराठी अभंग, भजन, गझल आदी उपशास्त्रीय संगीतप्रकारांमध्येही त्या आपल्या सुमधुर स्वरांची छटा उलगडतात. श्रुती या आसामी, इंग्रजी, हिंदी, बंगाली व मराठी भाषा बोलू शकतात. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान देशातील अनेक संगीत संमेलनात त्यांनी सादरीकरण केलेले आहे.
या मैफलीला त्यांना हार्मोनियम साथ वरद सोहनी, तबला साथ रोहित देव, पखवाज साथ मंगेश चव्हाण, व्हायोलिन -उदय गोखले, तालवाद्य साथ हरेश केळकर करणार आहेत. तसेच निवेदन पूर्वा पेठे यांचे असून ध्वनी संयोजन उदयराज सावंत (एस कुमार साउंड सर्व्हिस) करणार आहेत.
रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन वात्सल्यस्नेह ट्रस्टचे ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी केले आहे.



