रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाह
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण १ जुलैपासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे सुरू होत आहे. या ६ महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र युवकांनी २९ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने (१ जुलै ते ३१ डिसेंबर) असून, त्यासाठी १८ ते ३५ वर्षे (सोबत ओळखपत्र व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक) अशी वयोमर्यादा आहे. शैक्षणिक पात्रता किमान चौथी पास (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक) अशी आहे. उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा व त्याला किमान १ वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस असणे बंधनकारक आहे.
या प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण उमेदवारास ४५० प्रतिमहिना रुपये (६ महिन्यांचे एकूण २ हजार ७०० रुपये), तर दारिद्र्य रेषेखालील (BPL) उमेदवारास १०० रुपये प्रतिमहिना (६ महिन्यांचे एकूण ६०० रुपये) आकारले जाईल. (यासाठी ग्रामसेवक किंवा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.)
या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना सागरी नौकांवर पात्रतेनुसार ‘खलाशी’ म्हणून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत (NCDC) योजनेतून अर्थसाहाय्य घेऊन स्वतःची मच्छिमारी नौका बांधणेही शक्य होणार आहे.
इच्छुक युवकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्राशी किंवा ९४२२३७१९०१ या मोबाईल व व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. हा अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून, त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊन २९ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत वर नमूद केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर सादर करावा.
अधिक माहितीसाठी पेठकिल्ला, रत्नागिरी येथील ‘मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी’ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



