मुख्य बातमी

क्रिएटिव्ह करिअर्स मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

रत्नागिरी : महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या (बीकेव्हीटीआय) वतीने विद्यार्थिनी व पालकांसाठी क्रिएटिव्ह करिअर्स मार्गदर्शन सेमिनार २०२६ चे आयोजन करण्यात आले. दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना विविध व्यावसायिक क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा सेमिनार आयोजित करण्यात आला.

या सेमिनारमध्ये फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम तसेच ब्युटी अँड वेलनेस या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अपूर्वा पाडे (पुणे) यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील संधी व कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन केले. प्राजक्ता शिंदे (पुणे) यांनी इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रातील आधुनिक संधी व करिअर पर्यायांची माहिती दिली. दिशा सोलंखी (मुंबई) यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच भाग्यश्री शिंदे (पुणे) यांनी ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील व्यावसायिक संधी व प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. सेमिनारचे स्वरूप तज्ञाना विविध प्रश्नोत्तरे व चर्चेच्या माध्यमातून राहिले.

विद्यार्थिनी व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य करिअर निवडीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. या सेमिनारमुळे विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीनुसार व कौशल्यांनुसार करिअर निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

या कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्वरूपा सरदेसाई मॅडम यांचा विशेष सहभाग लाभला. तसेच महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हच्या मालक तथा “बीकेव्हीटीआय” सल्लागार समिती सदस्या ममता नलावडे यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “बीकेव्हीटीआय” समिती सदस्या आर्किटेक्ट कविता सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी परिश्रम तसेच घेतले. तसेच प्रसाद शेवडे (ट्रॅव्हल अँड टुरिझम विभाग), सिद्धी सावंत (ब्युटी अँड वेलनेस विभाग) आणि प्रीतम पावसकर (फॅशन डिझायनिंग विभाग) यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, सर्व कर्मचारीवृंद तसेच सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. उपस्थित विद्यार्थिनी व पालकांनी अशा उपयुक्त मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!