दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेची कोकण मंडळासह राज्यभरात तयारी पूर्ण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) जून-जुलै २०२६ या पुरवणी परीक्षांना आजपासून (१६ जून) सुरुवात होत आहे. कोकण विभागीय मंडळासह राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये या परीक्षेची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, प्रशासनाने परीक्षार्थींना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या पुरवणी परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे – इयत्ता १० वी (पुरवणी परीक्षा) : १६ जून ते ३० जून. नोंदणीकृत विद्यार्थी : एकूण ४८,७२३ (मुले: ३४,९३९, मुली: १३,७८४).
इयत्ता १२ वी (पुरवणी परीक्षा) : १६ जून ते ८ जुलै. नोंदणीकृत विद्यार्थी : एकूण १,०४,४९४ (मुले: ६९,६६४, मुली: ३४,८३०)
वेळेचे नियोजन आणि महत्त्वाच्या सूचना
विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मंडळाने परीक्षा दालनातील उपस्थितीबाबत पुढील नियम निश्चित केले आहेत. परीक्षार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रश्नपत्रिकांचे वितरण सकाळी ११.०० वाजता केले जाईल.
दुपारच्या सत्रातील परीक्षार्थ्यांनी दुपारी २.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकांचे वितरण दुपारी ३.०० वाजता केले जाईल. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या मुख्य परीक्षेप्रमाणेच या पुरवणी परीक्षेतही विद्यार्थ्यांना पेपरच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले आणि छपाई केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. इतर कोणत्याही संकेतस्थळावरील (वेबसाईट) किंवा अन्य यंत्रणेने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या धर्तीवर या पुरवणी परीक्षेमध्येही विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक (Practical), तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी गुण ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या संदर्भातील लिंक आणि सविस्तर सूचना विभागीय मंडळामार्फत राज्यातील सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आधीच निर्गमित करण्यात आल्या आहेत. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने यशस्वीतेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



