मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भीषण आगीत टोयोटा कार जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवितहानी टळली

लांजा : लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनातून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर लांजा तालुक्यात स्वतंत्र अग्निशामक वाहनाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर) हे त्यांच्या टोयोटा कार (एमएच ०१ एफबी ३७७४) मधून लांजाहून देवरुखकडे जात होते. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक पोहोचताच वाहनातून अचानक मोठा आवाज येऊ लागला आणि धूर निघू लागला. धोका लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे तसेच पोलीस शिपाई स्वप्नील कदम आणि उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, लांजा नगरपंचायतीकडे स्वतःचे अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्याने देवरुख नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

अलीकडेच अंजनारी पुलाजवळ ट्रकला आग लागल्याच्या घटनेतही अग्निशामक वाहनासाठी देवरुखवर अवलंबून राहावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तळवडे फाट्यानजीक वाहनाला आग लागल्याने लांजा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक वाहनाची गरज अधिक तीव्रतेने समोर आली आहे. शहरासह तालुक्यातील आगीच्या घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद मिळावा, यासाठी लांजा येथे कायमस्वरूपी अग्निशामक वाहन व आवश्यक अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!