मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेड शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात भंगार दुकानाला भीषण आग

खेड : शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात काल (१६ जून) सायंकाळी सुमारे ५.४४ वाजण्याच्या सुमारास भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचा पाण्याचा टँकर आणि अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याने पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. आग वाढून आसपासच्या परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने त्वरित बचावकार्य सुरू केले. पालिकेच्या पाण्याच्या टँकरच्या मदतीने आणि अग्निशमन विभागाच्या समन्वयातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या जागेचे मालक श्री. जाड्याल असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नसून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यावेळी घटनास्थळी मदतीसाठी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य नीलेश बामणे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!