मुख्य बातमी

लाच घेणारा जिल्हा पुरवठा अधिकारी “लाचलुचपत”च्या जाळ्यात

रत्नागिरी : गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे तसेच गैरहजर असल्याचे सांगून याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी पुरवठा निरीक्षकाकडे लाच मागणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला (वर्ग १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. लोकसेवक प्रदीप प्रीतम केदार (५० वर्ष, जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी : यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत. तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी आणि संगमेश्वरच्या तहसीलदार यांनी २२ मार्च रोजी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार गैरहजर होते. तसेच त्यानंतर लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. केदार यांनी तक्रारदार यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार लोकसेवक केदार यांनी २८ मार्च रोजी तडजोडीअंती ११ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले आणि लाचेची रक्कम रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय रत्नागिरी येथे सुरू आहे.

याकामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा दीपक आंबेकर, पोहवा संजय वाघाटे, पोह विशाल नलावडे, पोअं राजेश गावकर या सापळा पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाकाकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी अँन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२२८९३, ७५८८९४१२४७ अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!