रिपब्लिकन (आठवले) पक्षातर्फे गुहागरमध्ये निदर्शने
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास ठाम विरोध : दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनास पाठिंबा

आबलोली (संदेश कदम) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड, उपवर्गीकरणाद्वारे विभाजन करण्याचा कुटील डाव शासनाचा असून सामाजिक न्याय संविधानातील समता, स्वातंत्र व बंधुता या तत्वांचा शासनाला विसर पडल्यामुळे भारतीय संविधान बचावासाठी आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी दिल्ली येथील जंतर-मंतरवरील संविधानिक पद्धतीने चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनास पाठिंबा जाहीर करत केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे आणि विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर यांच्यावतीने करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत निवेदन पोचविण्यासाठी तहसीलदार कार्यालय गुहागर येथे निवेदन आणि भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना दोन निवेदने देण्यात आली.
त्यानंतर गुहागर पोलिस मैदान येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘घटनात्मक आरक्षणातील उपवर्गीकर थांबलेच पाहिजे’, ‘विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबलाच पाहिजे,’ ‘शासनाचा जाहीर निषेध’, ‘शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,’ अशा गगनभेदी घोषणांनी गुहागर दणाणून सोडले.
त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे तालुका प्रवक्ते शशिकांत जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक एस. एल. सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते यांनी संबोधित केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे, चिटणीस दशरथ पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) या पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत मोहिते, काशिनाथ सुर्वे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र कदम,तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, विलास गमरे, चंद्रकांत मोहिते, भीमसेन सावंत, शंकर मोहिते, अनिल जाधव, संतोष मोहिते, युवा कार्यकर्ते मयूर गमरे यांच्यासह भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. अतिशय शांततेत हा कार्यक्रम संपन्न झाला.



