मुख्य बातमी

आषाढी एकादशीनिमित्त कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात रंगला बालवारकऱ्यांचा “बालदिंडी” सोहळा

रत्नागिरी : र. ए. सोसायटी संचलित कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांचा बालदिंडी सोहळा अतिशय उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांनी पालखीतील विठ्ठलाची पूजा करून बालदिंडीला प्रारंभ केला. यावेळी शाळेतील काही चिमुकल्यांनी विठ्ठल, रुक्मिणीची रूपे धारण केली होती. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी पांढरा सलवार – कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी आणि कपाळावर बुक्का आणि चंदनाचा टिळा लावून, तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून दिंडीला पारंपारिकतेचा साज चढवला होता. ‘विठूचा गजर हरिनामाचा,’ ‘विठोबाला तुळशी,’ ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा हरिनामाचा गजर, अभंग म्हणत, टाळ – मृदंगाच्या तालावर शालेय परिसरातून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक रिंगण करून त्यामध्ये फुगड्या खेळल्या. त्यामुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. या बालवारकऱ्यांसोबत सर्व शिक्षकही बालदिंडीत प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

बालदिंडी सोहळा उत्तमरित्या पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख श्री. वेदरे, सौ. मेस्त्री तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पालकांनीही उपस्थित राहून दिंडीची शोभा वाढवली. शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी या बालवारकऱ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!