आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह जनजागृती कार्यक्रम 

रत्नागिरी : दि. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागात जागतिक स्तनपान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैद्यकीय अधिकारी (रुग्णालय प्रशिक्षण केंद्र) डॉ. वसीम सय्यद, अधिसेविका शिल्पा घाडगे, परिचर्या संवर्ग तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्तनपानाचे महत्त्व या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली.

या कार्यक्रमात जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व, बाळाला पहिले सहा महिने केवळ आईचे दूध (निव्वळ स्तनपान) देण्याची आवश्यकता, सहा महिन्यांनंतर योग्य पूरक आहार सुरू करण्याचे महत्त्व, कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्तनपानाची भूमिका, घर, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज या बाबींवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी मातांना स्तनपानाबाबत मार्गदर्शन केले तसेच समाजाने स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित स्तनदा मातांना पोषक खाऊचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!