महाराष्ट्रमुख्य बातमी

शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; कोल्हापूरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेस नेते, बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानेदव यशवंतराव पाटील तथा डी. वाय. पाटील (वय ९०) यांचे आज (४ ऑगस्ट) निधन झाले. कोल्हापूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ते डी वाय पाटील समूहाचे संस्थापक होते. हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची स्थापना केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.

डॉ. डी वाय पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. डॉ. पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. काहीकाळाने त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये घातले. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात शाळा, महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. त्याचबरोबर विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर या शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असतात. त्यांचे नातू ऋतुराज पाटीलही राजकारणात सक्रिय झाले आहेत.

डॉ. पाटील यांनी अनेक शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांची अनेक शैक्षणिक संकुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते वृद्धापकाळामुळे घरातच असायचे. परंतु आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांनी मंगळवारी कोल्हापुरातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. शिंदेंनी म्हटलं की, ‘त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावलाय. ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना. डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!