मुख्य बातमी

रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूलतर्फे शिष्यवृत्ती व एनएमएमएस गुणवंतांचा गौरव

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वेदांग पवारला सायकल भेट

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रशालेच्या १२५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात एकूण ३८ गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या २० शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने व स्वागतगीताने झाली. या सोहळ्यास रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई सपत्नीक उपस्थित होते. तसेच सौ. ज्योती गावंड मॅडम आणि उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश कडव यांची विशेष उपस्थिती लाभली. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे तसेच गणेश गुळवणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी भूषविले.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वेदांग पवार याचा भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर यांच्या वतीने सायकल भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम विशेष कौतुकाचा ठरला.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी विवेक घाटविलकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. कौस्तुभ पालकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकाऱ्यांनी पटवर्धन हायस्कूलने १२५ वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केल्याबद्दल प्रशालेतील सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी यशाची ही परंपरा कायम ठेवून भविष्यातही उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. गणेश गुळवणी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम आणि ध्येयपूर्तीचे महत्त्व याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोहिते यांनी केले, तर श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिष्यवृत्ती व एनएमएमएस गुणवंतांचा हा गौरव सोहळा संस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!