मुख्य बातमी

‘Bappa.org’च्या माध्यमातून गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

वैभवशाली गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याची संधी

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणाऱ्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरांचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर गणेशोत्सवाशी संबंधित आपल्या आठवणी, अनुभव, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या घरची किंवा सार्वजनिक गणेश मंडळाची आरती रेकॉर्ड करून अपलोड करणे, बाप्पाचे सुंदर छायाचित्रे प्रसिद्ध करणे, तसेच गणेशोत्सवाशी निगडित खास पाककृती व परंपरांची माहिती देणे, अशा विविध माध्यमातून नागरिकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

आपल्या गणेशोत्सवाचे सुंदर छायाचित्रेही या माध्यमातून अपलोड करता येणार आहेत. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशोत्सव तसेच पिढ्यानपिढ्या जपल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव परंपरांची या उपक्रमांतर्गत नोंद करण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थानिक श्रद्धा, प्रथा, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि उत्सवाचे विविध पैलू यांचेही डिजिटल दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या परंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हाव्यात, तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, यासाठी जिल्हावासियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

“जिल्हावासियांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जगासमोर आणाव्यात, त्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!