तळगाव (राजापूर) येथे गोवा बनावटीच्या बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : सुमारे १ कोटींचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

राजापूर : ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तालुक्यातील तळगाव येथे सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बनावट मद्याच्या मिनी कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भरारी पथकाने तळगाव येथे छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचा साठा तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.
या कारवाईदरम्यान जागामालक दिनेश जैतापकर आणि गोवा येथील चंदन पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोवा बनावटीच्या मद्याची नक्कल करून त्याच धर्तीवर बनावट मद्य तयार करण्यासाठी या ठिकाणी मिनी कारखाना सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अवैध मद्यविक्री, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथकाने तळगाव येथे कारवाई केली.
या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसाठा तसेच बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आढळून आल्याने विभागाने ते जप्त केले. या प्रकरणात दोन्ही संशयितांविरोधात संबंधित कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, मद्याच्या साठा कुठे वितरित केला जाणार होता आणि या प्रकरणाचे अन्य काही धागेदोरे आहेत का, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री आणि बनावट मद्याच्या व्यवसायाविरोधातील विभागाची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



