कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्यांच्या गाडीला लावली आग; रत्नागिरीत लॉजच्या पार्किंगमधील घटना

रत्नागिरी : पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी आल्याच्या रागातून शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कुझर गाडीला आग लावल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज (१७ सप्टेंबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. संशयिताने प्रथम वाहनाच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर पेट्रोल अथवा अन्य ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने वाहन पेटवून दिल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. यात एकूण १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अशोक नागाप्पा गोठेकर (२७, रा. कडेगाव, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादींचे मित्र अशोक बागडे (रा. कडेगाव, सांगली) यांनी फिर्यादीला माझ्या मुलीचे आणि जावयाचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी रत्नागिरीला जायचे असल्याने तू मोठी गाडी घेउन ये, असे १६ सप्टेंबर रोजी सांगितले होते. त्यानुसार, फिर्यादी यांनी राहुल काटकर (रा. सांगली) यांच्या मालकीची कुझर गाडी (एमएच-१०-बीएन-७१५२) भाड्याने घेऊन बुधवारी दुपारी रत्नागिरीला निघाले होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी संशयिताच्या कुटुंबाशी चर्चा करून त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात जाऊन प्रभारी अधिकाऱ्यांच्या समक्ष निर्णय घेण्याचे ठरले.
दरम्यान, फिर्यादी आणि सांगलीहून आलेल्या इतरांची आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. गुरुवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास लॉजमधील कामगाराने फिर्यादीच्या रुममध्ये जाऊन तुमच्या पार्किंगमधील गाडीला आग लागल्याचे सांगितले. फिर्यादी व त्यांचे सहकारी पार्किंगमध्ये गेले असता त्यांना अग्निशमन दल गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. फिर्यादीने हॉटेलच्या सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर त्यांना संशयित आकाश खेत्री गाडीच्या काचा फोडताना आणि गाडीला आग लावताना दिसून आला. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.



