मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

प्रवासादरम्यान रॅकवरील बॅग चोरीला : राजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

राजापूर : पुणे ते राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची रॅकवर ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. या बॅगेमध्ये सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा प्रशांत कांबळे (वय ३२, मूळ रा. पासर्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. जैतापूर, ता. राजापूर) या पुणे–राजापूर एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २२७२ मधून प्रवास करीत होत्या. त्यांनी प्रवासादरम्यान आपली काळ्या रंगाची ‘व्हिनस’ कंपनीची बॅग बसमधील वरच्या रॅकवर ठेवली होती. मात्र, प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने ही बॅग चोरून नेली.

बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (१ लाख ७५ हजार रुपये), ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स (३५ हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (३५ हजार रुपये) आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१७ हजार ५०० रुपये) अशा दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, चोरीचा तपास सुरू आहे. एसटी बसमधील प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!