मुख्य बातमी

काळाबादेवी येथे भव्य ढोल-ताशा स्पर्धा संपन्न; नाचणे येथील ‘शिवगर्जना ढोल पथक’ प्रथम

रत्नागिरी : काळाबादेवी येथील श्री देव रामेश्वर व श्री देवी कालिका माता नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून युवती सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काळाबादेवी यांच्या तर्फे नुकतीच आयोजित केलेली भव्य ढोल-ताशा स्पर्धा २०२६ अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन युवती सेना विभाग अधिकारी सौ. दिव्या सुर्वे यांनी केले होते. रत्नागिरी तालुक्यातील अनेक नामांकित ढोल-ताशा पथकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या वादनाने परिसर दणाणून सोडला होता.

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख संदेश नारगुडे, शिवसेना विभाग प्रमुख महेश नेवरेकर, युवासेना उप विभाग अधिकारी आराध्य नेवरेकर, तसेच सुहास जोशी आणि सुनील बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व नेटके सूत्रसंचालन सौ. विभूती जोशी यांनी केले. यावेळी युवती सेनेतर्फे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नवदुर्गा म्हणून तेथील स्थानिक महिलांचा पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

पारंपारिक वेशभूषा आणि शिस्तीचे पालन करत सर्वच पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत नाचणे येथील ‘शिवगर्जना ढोल पथक’ यांनी प्रथम क्रमांक (रु. ७,७७७/- व भव्य चषक) पटकावला. तसेच आंबेशेत मधील ‘नवलाई पावणाई जाकादेवी संघ’ याने द्वितीय क्रमांक (रु. ५,५५५/- व भव्य चषक) तर चिंचखरी येथील ‘श्री सांब रवळनाथ पथक’ याने तृतीय क्रमांक (रु. ३,३३३/- व भव्य चषक) मिळवला. स्पर्धेत उत्कृष्ट ढोल वादक म्हणून भाटीमिऱ्या येथील महापुरुष संघातील कु. अथर्व मयेकर आणि उत्कृष्ट ताशा वादक म्हणून आंबेशेत येथील नवलाई पावणाई जाकादेवी संघातील स्मित बोरकर यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या सांगता समारंभात शिवसेना विभाग प्रमुख महेश नेवरेकर यांच्या हस्ते अंतिम विजयी संघाला रोख रक्कम आणि भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांतील स्पर्धकांना प्रोत्साहनपर विशेष प्रमाणपत्रे देण्यात आली. मालगुंडकर वाडी (दत्त मंदिर जवळ, काळाबादेवी) येथे पार पडलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळाबादेवी शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, रणजितसिंह मालगुंडकर, निमिष मयेकर, करण निवेंडकर, गुरू कोलगे, सिद्धांत मयेकर आणि विराज मालगुंडकर यांनी विशेष मेहनत घेतली. या सोहळ्याला रसिकांची व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!