गुरु महिमा महोत्सवानिमित्त दिलसे फाऊंडेशनतर्फे मांडवी बीचवर स्वच्छता अभियान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
रत्नागिरी : सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांत सदैव अग्रेसर असलेल्या ‘दिलसे फाऊंडेशन’च्या वतीने ‘गुरु महिमा महोत्सवा’चे औचित्य साधून रत्नागिरीतील प्रसिद्ध मांडवी बीचवर भव्य स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. फाऊंडेशनच्या कोकण टीमच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडलेल्या या अभियानामुळे मांडवी समुद्रकिनार्याने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.
दिलसे फाऊंडेशनचे संस्थापक कपिल झवेरी, गुरमीत आणि करण शाह यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला होता. केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न साजरी करता समाजाला उपयुक्त ठरेल असा संदेश देण्याच्या उद्देशाने ‘गुरु महिमा महोत्सवा’चे औचित्य साधून या स्वच्छता मोहिमेची आखणी करण्यात आली. यामध्ये फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी मांडवी बीचवर साचलेला प्लास्टिकचा कचरा, काचा, थर्मोकोल व अन्य निरुपयोगी वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ केला.
दिलसे फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या चार प्रमुख राज्यांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम सातत्याने राबवले जातात. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी कार्य करणे हे फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रत्नागिरीतील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या मांडवी बीचची निवड करण्यात आली होती.
पर्यावरण संवर्धन आणि समुद्रकिनार्यांची स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे, हा मोलाचा संदेश या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आणि पर्यटकांना देण्यात आला. या मोहिमेत दिलसे फाऊंडेशनच्या कोकण टीमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेऊन आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे रत्नागिरीतील स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.



