मुख्य बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात व्याख्याने, निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा तसेच माहिती पत्रकांचे वाटप करून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित निबंध स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच, रत्नागिरीतील श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष बर्वे उपस्थित होते. याशिवाय दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता कुणकेरकर व जनसंपर्क अधिकारी देसाई यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधून भ्रष्टाचार निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले.

संगमेश्वर (देवरुख) येथील तहसीलदार कार्यालय, देवरुख पोलीस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, उपकोषागार व जि. प. उपअभियंता कार्यालय परिसरात पोलीस निरीक्षक जाधव व कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. उपस्थित नागरिकांना माहिती पत्रके (हँडबिल) वाटून दर्शनी भागात एसीबीचे जनजागृती स्टिकर्स लावण्यात आले.

दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाणे, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तसेच दाभोळ-धोपावे जेटी परिसरामध्ये पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील व पोलीस अंमलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती दिली आणि स्टिकर्स लावले.

स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी, डिजिटल बॅनर्स तसेच व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातूनही भ्रष्टाचारविरोधी संदेश सर्वदूर पोहोचवण्यात येत असल्याचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!