माचाळ (लांजा) गावात प्रथमच एसटी बस सेवा सुरू

लांजा : ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून लांजा-माचाळ बसफेरी सुरू झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेल्या माचाळ गावात पूर्वी जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. माचाळ पर्यटन संस्थेचे विवेक सावंत आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून गावापर्यंत रस्ता तयार झाल्यानंतर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पं.स. सदस्य उमेश पत्की, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांना यश आले असून रविवारी सकाळी ८.३० वाजता लांजा बसस्थानकातून पहिली एसटी माचाळच्या दिशेने रवाना झाली.
लांजा बसस्थानकातून बस रवाना झाल्यानंतर केळवली व भोजवाडी येथे ग्रामस्थांनी बसचे स्वागत केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा आगाराचे प्रकाश झोरे तसेच राजेंद्र पाटोळे यांच्यासह लांजा आगाराचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या सुविधेमुळे ग्रामस्थांसह पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे.



