देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मधुमक्षिका पालन क्षेत्रभेट

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहायक किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी मार्गदर्शक केले.
मार्गदर्शकांच्या स्वागत व अल्प परिचयाने क्षेत्रभेटीला सुरुवात झाली. डॉ. संतोष वानखेडे यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मधमाशी पालन या क्षेत्रासंबंधी महाराष्ट्रातील संशोधन, चालू घडामोडी त्याचबरोबर मधमाशीच्या प्रजाती याची माहिती दिली. विविध जातींनुसार व्यवसायाला होणारा फायदा याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.
क्षेत्रभेटीवेळी आसपासच्या परिसरातील त्यांनी तयार केलेले संच दाखवून त्याची रचना स्पष्ट केली. त्यांनी स्वतः संरक्षक कीट घालून मधमाशी संच उघडून दाखवला व प्रत्येक भागाचे नाव व महत्त्व सांगितले. काही इच्छुक विद्यार्थ्यांनी हे कीट घालून त्यांच्यासमोर प्रात्यक्षिक देखील केले.

डॉ. वानखेडे यांनी मधमाशीचे जीवनचक्र, अंड्यापासून ते नर, राणी माशी, कामगार माशी असे होणारे रुपांतर याचा व्यवसायात कसा विचार करावा याचे मार्गदर्शन केले. अनेक पद्धतीने याविषयी होणारे संशोधन, नव्या प्रजातींचा शोध अशी त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा नमूद केली. यावेळी बोलताना नव्या पिढीने याकडे वळावे व व्यवसाय म्हणून याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी आवर्जून केले. अखेरीस नारळा संबंधित मित्र कीटकांविषयी प्रयोगशाळेत चालणारे काम त्यांनी प्रत्यक्षपणे दाखवले. भविष्यात याचा व्यवसाय म्हणून विचार करताना योग्य असे प्रशिक्षण घेऊनच सुरुवात करावी असे मार्गदर्शन त्यांनी केले. सर्व प्रश्नांचे डॉ. वानखेडे यांनी निवारण केले.
या वेळी प्रथम वर्ष विज्ञान (सी.बी. झेड ग्रुप) शाखेचे पाच विद्यार्थी तसेच प्रा. सानिका कीर व प्रा. मनिषा मावडी उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आरती पाध्ये यांनी डॉ. वानखेडे यांचे आभार मानले.



