शासनाची जलजीवन योजना अद्याप “जैसे थे” गुहागरात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण
गुहागर मनसे आक्रमक

आबलोली (संदेश कदम) : शासनाकडून एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविली जात असलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यातील अनेक ठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही परिस्थिती “जैसे थे” असल्याने गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनसे आक्रमक भूमिका धारण करेल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाची जलजीवन योजना अद्याप जिथेच्या तिथेच आहे. गुहागर तालुक्यात बहुतांशी ठिकाणी ही कामे अपूर्णच आहेत. या विषयासंबंधीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. जनतेच्या पत्रव्यवहारांकडे प्रशासनाकडून जाणून – बुजून कानाडोळा केला जात आहे. या सदर योजनेच्या ठेकेदारांवर आपण कोणती कार्यवाही केली याची माहिती मिळावी.
यामध्ये पुढे म्हटले आहे की, ठेकेदारांनी फक्त पाईप टाकून आपली बिलं काढून घेतली; परंतु काम अर्धवटच आहे. तसेच ठेकेदारांनी टाकलेली पाईपलाईन तशीच पडून राहते आणि शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे ठेकेदारांनी पाण्याचा स्रोत तपासणे गरजेचे आहे. या प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या जात आहेत. ही योजना लवकरच पूर्ण झाली असती तर ग्रामस्थांना पाण्याच्या प्रश्न मार्गे लागला असता मे महिन्यात अनेक ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
याप्रकरणी आपण वेळेत लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका धारण करेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.



