क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीच्या बुद्धिबळपटूंची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : येथील दोन युवा खेळाडू वरद पेठे व सौरिष कशेळकर यांनी नुकत्याच झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वरद पेठे याने कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त केले. ५५ फिडे मानांकित खेळाडूंसह एकूण २५० पेक्षा अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अखेरच्या तीन फेऱ्यांत गोव्यातील स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध वरदने चांगली कामगिरी केली. स्पर्धेत एकही डाव न गमावता ८ फेऱ्यांअखेर ७ गुणांसह सरस टायब्रेकच्या जोरावर त्याने उपविजेतेपदाला गवसणी घातली. तसेच वरदने नुकतेच २५ वर्षे वयोगटातील रत्नागिरी जिल्हास्तरीय क्लासिकल स्पर्धेचे अजिंक्यपद देखील प्राप्त केले आहे.

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना वरद पेठे.

सौरिष कशेळकर याने सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक अखिल भारतीय जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविली. एकूण २९० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सौरिषने खुल्या गटात अकराव्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. सौरिषने स्वतःच्या जलद फिडे मानांकनात २० गुणांची वाढ नोंदविली. तसेच सौरिषने नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या युनिटी क्लब द्वितीय खुल्या अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत २०० पेक्षा अधिक खेळाडूंमधून नववा क्रमांक प्राप्त केला.

सांगली येथे खासदार चषक जलद फिडे मानांकन स्पर्धेत पारितोषिक स्वीकारताना सौरिष कशेळकर.

हे दोन्ही गुणवान युवा बुद्धिबळपटू सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याने रत्नागिरीतील बुद्धिबळ जगतात त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!