मुख्य बातमी

रत्नागिरीत शौर्यवंदना तिरंगा रॅलीतून भारतीय सैनिकांना मानवंदना

रत्नागिरी : पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करून पाकिस्तानला अद्दल घडविली. अशा पराक्रमी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ, त्यांना मानवंदना देण्यासाठी शनिवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व रत्नागिरीकरांनी एकजूट दाखवत शौर्यवंदना तिरंगा रॅली काढली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..भारत माता की जय..वंदे मातरम..जय जवान जय किसान..’ अशा घोषणाबाजीत जयस्तंभला पुष्पचक्र वाहून सांगता झाली.

शौर्यवंदना तिरंगा रॅलीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मारुती मंदिर येथे सर्वप्रथम अमर जवान प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पूष्पहार वाहून वंदन करून या रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीत वाजविले.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, “तिरंगा रॅलीच्या निमित्ताने सगळ्या रत्नागिरीकरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिले हे स्पष्ट करतो की मी जरी व्यासपीठावर असलो तरी रत्नागिरीकरांचा एक प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर आहे आणि म्हणूनच माझी सैनिकांना सगळ्या व्यासपीठावर बोलावलंय. ही रॅली रत्नागिरीकरांची आणि राष्ट्र प्रेमाची आहे, हे सगळ्यांनी मिळून दाखवून दिले आहे. मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणचा मुरली नाईक एक सैनिक या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये धारातिर्थी पडला. हैदराबादला त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या आई-वडिलांना मी भेटलो. एखाद्याच्या घरामध्ये निधन होतं तर त्याला तेरा दिवस असेल, दोन महिन्यांनी असेल, एक वर्षाने असेल ही विसरण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, माझ्या मुलासाठी १४० कोटी जनता रडते हे आमच्या आयुष्यातलं परम भाग्य आहे आणि म्हणून माझा मुलगा हा कायमस्वरूपी अमरच राहणार आहे. हे त्या आई-बापाने मला सांगितलं. असे सैनिक, माजी सैनिक जे आपल्यासाठी लढतात त्यांच्यामुळेच आपण सगळे सुरक्षित आहोत. त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलंय.”

“सगळ्या संस्थांचा, प्रशासनाचा, सगळ्या पक्षांचा सहभाग आहे. या व्यासपीठावर असलेले माजी सैनिक हेच आमचे आयडॉल आहेत आणि हेच आमचे भविष्यामध्ये आयडॉल राहतील. एवढी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे आमच्यामध्ये जागृत होईल. हा शब्द सगळ्या माजी सैनिकांना देतो. भारत हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ जगामध्ये ठरू शकतो हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा सैन्यांने दाखवून दिले, त्याबद्दल सैन्याचे देखील आभार मानतो. रत्नागिरीकरांच्यावतीने शब्द देतो ज्यावेळी देशाच्या चिंतेची बाब निर्माण होईल, तर रत्नागिरी जिल्हा हा केंद्र शासनाबरोबर म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर ठामपणे उभा राहील,” असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

“आमच्यामध्ये मतभेद असू शकतात. कोण मोठा याच्यामध्ये आमची स्पर्धा असू शकते. परंतु, राष्ट्र प्रेमामध्ये आमच्यामध्ये स्पर्धा असू शकत नाही. हेही रत्नागिरीकरांनी आज तुम्हाला दाखवून दिले आहे. आम्ही पक्षाने वेगवेगळे असू. राष्ट्र प्रेमासाठी आम्ही तिरंग्याच्या झेंड्याखाली सगळे हजारोंच्या संख्येने एकत्र येतो. देशाच्या आणि जगाच्या युद्धाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की, देश युद्ध कशा पद्धतीने करतोय, हे प्रेझेंट करण्याचं काम जगाच्या पाठीवर आमच्या दोन महिला भगिनींनी केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ते म्हणजे आपल्या डिफेन्स ची माहिती देणारी सोफिया कुरेशी होती. ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त करून तिरंगा रॅली ही सैनिकांच्या सन्मानार्थ, त्यांना मानवंदना देण्यासाठी असल्याचे सांगितले.

ही रॅली देशप्रेमाच्या घोषणा देत, हाती तिरंगा डौलवत जयस्तंभकडे निघाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी सैनिक अमृत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. जयस्तंभ येथे राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवृत्त कर्नल प्रशांत चतुर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये राजेश सावंत, दीपक पटवर्धन, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, वकील बंटी वणजू, सुदेश मयेकर यांच्यासह शासन, प्रशासन, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!