राजापूर पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीस मंजुरी द्या
उपसभापती अभिजीत गुरव यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

राजापूर : पंचायत समितीची विद्यमान प्रशासकीय इमारत अतिशय जीर्णावस्थेत असून, सर्व विभाग एकाच छताखाली नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पंचायत समितीसाठी नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारतीस तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, राजापूर तालुका सुमारे ५० किलोमीटरपर्यंत विस्तारलेला असल्याने ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात. मात्र पंचायत समितीचे विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याने नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून, कामकाजातही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या इमारतीसाठी पंचायत समितीकडे जागा उपलब्ध असून, त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे २२ गुंठे, महसूल विभागाच्या नावे १२ गुंठे आणि उर्वरित ७५ गुंठे जागा पंचायत समितीच्या नावे आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील जागा पंचायत समितीकडे हस्तांतरित करून नवीन इमारतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीही उपसभापती अभिजीत गुरव यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यावेळी मंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नवीन प्रशासकीय इमारत उभारल्यास पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होऊन नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि प्रभावी सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



