ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलायझेशनसाठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन

रत्नागिरी : रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलायझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा आर्थिक लाभ मिळण्यापासून अनेक ज्येष्ठ नागरिक वंचित राहिलेले आहेत. या कामासाठी तहसीलदार कार्यालयात वारंवार जाणे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून वस्तुस्थिती त्यांच्या नजरेला आणून दिल्यानंतर या कामाला गती आली असून, ज्येष्ठ नागरिकांची सोय करण्यासाठी तहसीलदार, रत्नागिरी यांनी २२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिवाजी नगर (नरहर वसाहत) येथील सभागृहात विशेष कॅम्प आयोजित केला आहे.
ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्यासोबत रेशन कार्ड, रेशन कार्डमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची आधार कार्ड, गॅस नोंदणी पुस्तक (पास बुक), उत्पन्नाचा दाखला (असल्यास), कुटुंबामध्ये कोणी दिव्यांग असल्यास त्याचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.
दरम्यान, ही सुविधा संघाच्या सभासदांना तसेच अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



