मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मंडणगड तहसील कार्यालय परिसरात तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

मंडणगड : शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमीनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकारी म्हाप्रळ अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना लाचलुचपत विभागाने ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. २७ मे रोजी सांयकाळी सव्वासहा वाजण्याचे सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाई करण्यात आली.

 

या संदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार, सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडून करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये रकमेची मागणी केली अशी तक्रार तक्रारदाराने केली आहे. तक्रार देण्यापूर्वी यापैकी ४५ हजार रुपये मारुती भोसले याने ऑनलाइन स्वीकारले, परंतु फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने २७ मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्या समक्ष भेट घेतली. तेव्हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी २७ मे रोजी पडताळणी दरम्यान ३० हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.

तक्रारदार यांच्याकडून मारुती भोसले याने ३० हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यातील स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा १५ हजार ५०० रुपये स्वतःसाठी ठेवून उर्वरित १४ हजार ५०० रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला. म्हणून तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई मारुती भोसले यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत ठाणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, पोलीस उप अधीक्षक रत्नागिरी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहा. पो. फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनावडे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!