मुख्य बातमीशैक्षणिक

पटवर्धन हायस्कूलमधील आठवीच्या १३ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून, यापैकी नित्या संदीप फणसे (राज्यात तिसरी), आदित्य महेश दामले (राज्यात सहावा), ललित अनंत डोळ (राज्यात बारावा), तर मधुरा संजय पाटील (राज्यात सोळावी) चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत झेप घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी आणि पर्यवेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

पटवर्धन शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाही इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवून शाळेची मान उंचावली आहे. एकूण १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावली असून, त्यापैकी चार विद्यार्थी राज्यभरातील गुणवत्ता यादीत चमकले आहेत, ही शाळेसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

श्रावणी तेजस शेडेकर, सिद्धी शैलेश भाटकर, स्वराज दीपक साळुंखे, आदिती विनोद शेलार, आश्लेषा रमेश काळे, अंतरा अमेय रायकर, मैत्री महेश सूर्यवंशी, आर्ची सुदेश नाटेकर, यज्ञा वीरेंद्र मयेकर या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या यशाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. संस्था पदाधिकारी श्रीराम भावे, दादा वणजू, नचिकेत जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या नियोजित अभ्यासाचे आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यवेक्षक श्री. लवंदे व उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनीही मुलांचे कौतुक केले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे पटवर्धन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठीसाठी श्री. पालकर, श्रीमती केळकर, गणितासाठी श्रीमती दामले व श्रीमती बंडबे, श्री वावरे, इंग्रजीसाठी श्रीमती डोंगरे, बुद्धिमत्तेसाठी श्रीमती पिलणकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!