रामभाऊ बेंडल साहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू : साहिल आरेकर

आबलोली (संदेश कदम) : लोकनेते, स्व. रामभाऊ बेंडल साहेबांना मी प्रत्यक्षात पाहिले नसले तरी त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. रामभाऊ बेंडल साहेबांच्या लोकोपयोगी विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी दिले.
गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे उद्धारकर्ते, माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा शृंगारतळी येथे गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ, शाखा तालुका गुहागर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामभाऊ बेंडल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी रामभाऊ बेंडल यांना अभिवादन करताना त्यांचे आजोबा कै. सदाशेठ आरेकर, रामभाऊ बेंडल आणि माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या कार्याचा गौरव करताना या तालुक्यातील दिग्गज व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्या आहेत. आज पक्ष वेगळे असले, तरी राजेश बेंडल आपली विचार धारा एक आहे. राजेश बेंडल यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहेत. २०२९ मध्ये गुहागर तालुक्याचा आमदार आम्हाला राजेश बेंडल यांच्या रूपाने पहायचा आहे, असे स्पष्ट मत साहिल आरेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पांडुरंग पाते, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे, ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदीप बेंडल, मुस्लिम समाजाचे महामुद कादीर बारमारे गुरुजी, महेश कातकर, माजी सभापती विलास वाघे, महादेव साटले, युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश मते, अनंत पागडे, शंकर मोरे, गिरीश बारस्कर आदी मान्यवर तसेच यावेळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज संघटनेचे तालुका सचिव प्रदीप बेंडल यांनी केले.



