अपघातग्रस्त टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

रत्नागिरी : हातखंबा शाळेजवळ एका अवघड वळणावर पलटी झालेल्या गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या वाहनात ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला आज (३० जुलै) सकाळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लवकर सुरुवात झाली.
हा अपघात काल (२९ जुलै) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक रात्रभर बंद ठेवण्यात आली होती. तसेच काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात आला होता. पुलावरून टँकर खाली कोसळल्यामुळे टँकरमध्ये असलेला एलपीजी गॅस बाहेर पडत होता. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या गॅस गळतीमुळे खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तसेच वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
आज सकाळी या अपघातग्रस्त टँकरला क्रेनच्या सहाय्याने सरळ करून तज्ञांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. या कामासाठी सुमारे तीन ते चार तासांचा अवधी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गॅस शिफ्टिंगच्या प्रक्रियेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



