गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त पारितोषिकांचे वितरण
वरदा महेश मुळ्ये 'आदर्श विद्यार्थी परितोषिकाने' सन्मानित

रत्नागिरी : लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विविध विभागांच्या निर्धारित पारितोषिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कोकणातील प्रसिद्ध वक्ते आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गजानन पळसुलेदेसाई आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक आणि गणित विभागाने दिलेले हे पारितोषिक प्रथम वर्ष विज्ञान शाखेत गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाते. या वर्षी प्रणव महादेव कदम या पारितोषिकाचा मानकरी ठरला. कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक आणि गणित विभागाने दिलेले हे पारितोषिक द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत गणित विषयात प्रथम येणाऱ्या व तृतीय वर्षात विज्ञान शाखेत गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाते. या वर्षी शिवम राजन कीर या विद्यार्थ्यास या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
लोकमान्य टिळक पारितोषिक आणि गणित/ संस्कृत विभागाने दिलेले पारितोषिक बारावी मध्ये गणितसंस्कृत विषय घेऊन प्रथम वर्षात गणित / संस्कृत विषय ठेवणाऱ्या विद्यार्थ्यास हे पारितोषिक दिले जाते. दरवर्षी एकदा गणित व एकदा संस्कृत विषयास असे हे पारितोषिक देण्यात येते. यावर्षी गणित विषयासाठी हे पारितोषिक देण्यात आले. अनम असिफ नाईक यांना या पारितोषिकाने गौरविण्यात आले.
कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक आणि मराठी विभागाने दिलेले पारितोषिक द्वितीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या आणि तृतीय वर्ष कला शाखेत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाते. या वर्षी गौरी सुरज कीर ही विद्यार्थिनी या पारितोषिकाची मानकरी ठरली.
कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक हे महाविद्यालयातील सर्वगुण संपन्न, हुशार, अभ्यास आणि अभ्यासेत्तर उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विद्यार्थी वा विद्यार्थिनीस दिले जाते. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची इन्स्पायर शिष्यवृत्ती प्राप्त करणारी, याच विभागाने रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे आयोजित केलेल्या इंटरशीप शिबिरासाठी निवड झालेली, आयआयटी मद्रास संशोधन शिष्यवृत्ती २०२५ साठी देशभरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निवड झालेली आणि रुपये १५००० शिष्यवृत्तीने सन्मानित अशी महाविद्यालयाची गुणी विद्यार्थिनी वरदा महेश मुळ्ये यांना यावर्षीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी जान्हवी सचिन जोशी (प्रथम क्रमांक), रिझा लाईक हरचीरकर (द्वितीय क्रमांक), रुहीना इक्बाल राजवाडकर (तृतीय क्रमांक) आणि ओंकार मंदार आठवले (उत्तेजनार्थ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


