दहिवली, खेड येथील भूस्खलन दुर्घटनेतील बचावकार्यात सहभागी पोलीस अधिकारी, तरुणांचा गौरव

रत्नागिरी : दहिवली (ता. खेड) गावातील शेलारवाडी येथे मुसळधार पावसामुळे ६ जुलैला झालेल्या दुर्दैवी भूस्खलनाच्या घटनेनंतर राबविण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यामध्ये धैर्य, तत्परता आणि सेवाभाव दाखविणाऱ्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे तसेच दहिवली गावातील युवकांचा रत्नागिरी पोलीस दलातर्फे गौरव करण्यात आला. काल (२४ जुलै) पोलीस अधीक्षक कार्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. या दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
या दुर्घटनेत काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध व बचाव कार्य सुरू केले होते.
या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक आहिरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच दहिवली गावातील युवकांनी तब्बल २१ तास अथक परिश्रम घेत शोध व बचाव मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. मुसळधार पाऊस, चिखल आणि जीव धोक्यात घालून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे बचाव मोहिमेला मोठे बळ मिळाले.
या आपत्तीच्या काळात रत्नागिरी पोलीस दलाला खेड येथील युवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याचे कौतुक करण्यात आले व या निःस्वार्थ योगदानासाठी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक श्री. आहिरे, खेड पोलीस ठाणे व दहिवली गावातील युवकांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.



