टेरवच्या सुमन विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) मार्च २०२५ परीक्षेचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
या परीक्षेत आदित्य गोपीचंद कदम याने ९२.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी अनंत कदम हिने ९२.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर समर्थ सुदेश साळवी याने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. या निकालामध्ये प्रशालेमधून एकूण ३१ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रावीण्य श्रेणीत १२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी यांनी नेत्रदीपक यश मिळवले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकासराव कदम, सचिव योगेशराव कदम, खजिनदार अजितराव कदम, तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक व पालक यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.



