समृद्धी आंबेकरला चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता १०वी मधील विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर हिला चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षी गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार तिने निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, राष्ट्रीय कीर्तनकार व व्याख्याते डॉ. चारुदत्त आफळे, निवड समितीचे प्रतिनिधी डॉ. मिलिंद गोखले, डॉ. प्रसाद देवधर या प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वीकारला. गौरव चिन्ह, गौरव प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुस्तकरूपी भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा कार्यक्रम चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नुकताच झाला. समृद्धीने पुरस्कार संपादन केल्याबद्दल तिचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पत्रकार, मित्रपरिवार आदींनी अभिनंदन केले.



