निवेबुद्रुक येथे वँगनआर कारचा भीषण अपघात
डंपरला पाठीमागून दिली जोरदार धडक; एकाचा मृत्यू, तर चारजण जखमी

संगमेश्वर : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील निवेबुद्रुक येथे आज सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून आलेल्या एका वॅगनआर कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत एका नमन कलाकाराचा मृत्यू झाला असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून हे सर्व कलाकार पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने (क्र. एमएच-०२-जेपी-९४९३) निवळीच्या दिशेने प्रवास करत होते. निवेबुद्रुक परिसरात आले असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर (क्र. एमएच-०८-जी-१५५९) पाठीमागून प्रचंड वेगाने आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर आणि संतोष सांडिम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नमन कलाकार विनायक सपकाळ (वय ३०, रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर मंगेश पाताडे (४५), नंदिनी पाताडे (४०, रा. वांद्री संगमेश्वर) हे दोघे पती पत्नी असून मंगेश यांच्या डोक्याला तर पत्नी नंदिनी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर पांचाळ (५३, ड्रायव्हर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
त्यांनी कारमध्ये आणि डंपरखाली अडकलेल्या जखमींना अत्यंत शिताफीने बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका सेवेचे चालक मनोज पांचाळ यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मृत्यू झालेल्या नमन कलाकाराची ओळख अद्याप पटलेली नाही. रुग्णालयात दाखल इतर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची नोंद करून देवरुख पोलीसांनी या अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.



