चिपळूण शहरातील तीन रस्त्यांचे रुंदीकरण होणार

चिपळूण : शासनाने मंजूर केलेल्या चिपळूण शहर विकास आराखड्यानुसार शहरातील तीन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याबाबत चिपळूण नगरपालिकेकडून १७ ऑगस्ट रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरातील बहादूरशेख नाका ते चिंचनाका, चिंचनाका ते पावर हाऊस तसेच अमेय पार्क ते गांधारेश्वर ब्रिज या तीन रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाची जागेवर प्रत्यक्ष आखणी चिपळूण नगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे. शहरातील या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना त्यांच्या जमिनी ताब्यात देण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या असून, स्मरणपत्राद्वारेही कळविण्यात आले आहे. संबंधित मिळकतधारकांना जमिनीच्या मोबदल्यात एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) अथवा टीडीआर देण्याची तरतूद असल्याचे नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जमिनीच्या मोबदल्यात एफएसआय अथवा टीडीआर घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित मिळकतधारकांनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित जमिनीचा मोबदला एफएसआय अथवा टीडीआरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या संदर्भातील आवश्यक कार्यवाही संबंधित मिळकतधारकांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत करावी, असे नगर परिषद प्रशासनाने कळविले आहे. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाची पुढील कार्यवाही चिपळूण नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे.



