‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत विविध उपक्रम
१७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहीम : महिला-बालकांविषयीचे कायदे, योजना आणि हेल्पलाइनची माहिती

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिक व लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा आणि योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोली आणि खेड या तालुक्यांमधील ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालये तसेच आदिवासी पाडे व वस्त्यांवर थेट पोहोचून जनजागृती केली जात आहे.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे कायदे व हक्क, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना, बालकांविषयीचे कायदे, बालसुरक्षा यंत्रणा, चाईल्ड हेल्पलाइन (१०९८), महिला हेल्पलाइन (१८१) यांसह महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.


