मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नाटे सागरी पोलिसांची जलद आणि प्रभावी कामगिरी; अवघ्या १२ तासांत शिसे चोरी उघडकीस

दोघेजण ताब्यात १.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राजापूर : सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तपासकौशल्य सिद्ध करत अवघ्या १२ तासांच्या आत तब्बल १ लाख ४७ हजार २०० रुपये किंमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे हस्तगत केले असून, या चोरीत सहभागी असलेले दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे किनारी भागात अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा बसणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागरी पोलीस ठाणे नाटे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तालुक्यातील कातळी सडा येथे घडला.

फिर्यादी नासिर इसहाक मजगावकर (वय ४७, रा. कातळी) यांनी तक्रार दिली की, चंद्रशेखर रजनिकांत कुश्ये (रा. मेढा, ता. मालवण) यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छिमारी जाळे त्यांनी दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील शब्बीर नाखेरकर यांच्या कंपाऊंडमध्ये काळ्या ताडपत्रीने झाकून ठेवले होते. तथापि १६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी तपासणी केली असता जाळ्यातील सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीस गेलेले आढळले. त्यानंतर त्यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा वापर आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.

केवळ १२ तासांच्या तपासानंतर पोलिसांनी मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धालवली मुस्लिमवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) आणि समीर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून तब्बल १,४७,२०० रुपये किंमतीचे (४६० किलो वजनाचे) पर्सनेट मच्छिमारी जाळ्याचे शिसे जप्त करण्यात आले. (दर प्रति किलो रुपये २३०/- प्रमाणे)

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यापूर्वी क्राईम ब्रँच रत्नागिरी शाखेत पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले असून, त्या काळात मिळवलेला गुन्हेगारी तपासाचा अनुभव व तांत्रिक माहितीचा सखोल वापर त्यांनी या प्रकरणात प्रभावीपणे केला. त्यांच्या कुशल तपासकौशल्यामुळे आणि योग्य दिशेने मार्गदर्शनामुळे हा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे, पो.कॉ. पाटील, पो.कॉ. जाधव, पो. कॉ. कुसाळे व पो. कॉ. बांदकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!