‘मी तुला नेहेमी सुखी ठेवेन…’ चिमुकल्यांनी दिले वचन
संकेता सावंत यांच्या प्रशिक्षण केंद्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा

रत्नागिरी : ‘मोठं झाल्यावर मी तुला कायम सुखी ठेवेन…’ असे वचन देत संकेता संदेश सावंत यांच्या अभ्युदयनगर येथील तायक्वांदो प्रशिक्षण वर्गात जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येक मुलाने आपल्या महिला पालकाचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले आणि मोठे झाल्यावर त्यांना कायम सुखी ठेवण्याचे वचन दिले. यावेळी सर्व पालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी पालक आणि मुलांना खाऊ देण्यात आला.

मुलांच्या मनात आई, आजी, काकू, मावशी, आत्ते, ताई अशा वेगवेगळ्या नात्याने बांधल्या गेलेल्या तिच्याबद्दल सदैव कृतज्ञता राहावी यासाठी बाल मनावर संस्कार करणारे असे छोटे छोटे क्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी सर्व पालकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षिका संकेता सावंत यांच्यासह सौ. श्रेया पवार, सौ. आकांक्षा जैन, सौ. निकिता कवितके, डॉ. प्रियांका कांबळे, डॉ. उज्ज्वला कांबळे आणि सौ. सोनाली सावंत हे पालक उपस्थित होते.


