मुख्य बातमी

रत्नागिरीत एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न

रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरात प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बससमोर दुचाकी आडवी लावून एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर असलेल्या चालकास धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारात चालक म्हणून सेवेत असणारे नागनाथ ब्रम्हदेव माळी (वय ३५, मूळ रा. कामते खुर्द, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री रत्नागिरी ते खेडशी नाका या नियोजित मार्गावर बस (क्र. एमएच-१४-बीटी-४४६२) घेऊन जात होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास माळनाका येथील हेळेकर मिठाई दुकानासमोर असलेल्या अधिकृत बसथांब्यावर प्रवासी उभे असल्याचे पाहून चालकाने डाव्या बाजूचा इंडिकेटर दाखवून बस बाजूला घेतली. थांब्यावरील प्रवाशांना चढवून बस पुढे मार्गस्थ होत असतानाच, एमएच-०८-बीजे-८११८ क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाने एसटी बसच्या समोर थेट आपली दुचाकी आडवी लावून बसचा रस्ता अडवला.

त्यानंतर दुचाकीवरून खाली उतरलेल्या चालकाने एसटी चालक गणवेशात व कर्तव्यावर असल्याचे माहीत असूनही ‘येथे गाडी का थांबवलीस’ असा जाब विचारत चालक माळी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता थेट बसमध्ये चढला आणि त्याने चालकाला मारण्यासाठी अंगावर धावून जात येथून बस पुढे हलवायची नाही अशी थेट धमकी दिली. प्रवाशांच्या उपस्थितीत एसटी चालकाला कामापासून परावृत्त करत सरकारी कामात थेट अडथळा आणण्याचा हा प्रकार घडला.

या घटनेनंतर चालक नागनाथ माळी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी क्रमांक एमएच-०८-बीजे-८११८ वरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२६(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, वाहन क्रमांकाच्या आधारे संशयित दुचाकी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!